कराड : तालुक्यातील शेणोली रेल्वे स्थानकाजवळ सह्याद्री एक्सप्रेसमध्ये घडलेल्या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून सिग्नल बंद पाडला. त्यामुळे रेल्वे शेनोली स्टेशनजवळ थांबली. ही संधी साधत आरोपींनी रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवाशांना लक्ष्य केले. त्यांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम लंपास केली.
या घटनेदरम्यान काही प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत लूट सुरूच ठेवली, अशी माहिती समोर येत आहे. हा प्रकार सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील भागात घडला असून, घटना मध्यरात्री सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सह्याद्री एक्सप्रेस काही काळ उशिराने पुढे रवाना झाली. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून ट्रेन थांबवून दरोडा टाकण्याचा हा प्रकार अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागे एखादे संघटित टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
