पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनांना देण्यात येणाऱ्या ‘एमएच-१२’ नोंदणी क्रमांकांची मालिका आता संपण्याच्या मार्गावर आली आहे. सध्याची ‘एमएच-१२’ मालिका अवघ्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता असल्याने नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये, यासाठी पुण्यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन नोंदणी मालिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील नवीन वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेला संभाव्य अडथळा निर्माण होणार नाही.

 

पुणे आरटीओकडून सध्या दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच-१२-झेडझेड’ ही मालिका सुरू आहे. दोन अक्षरी मालिकेतील उपलब्ध पर्याय जवळपास संपल्याने ही मालिकाही काही दिवसांत संपण्याची शक्यता आहे. ‘एमएच-१२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. परिणामी, तातडीचा पर्याय म्हणून पुण्यासाठी स्वतंत्र ‘एमएच-६१’ मालिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

वाहन नोंदणी क्रमांकांची उपलब्धता वाढविण्यासाठी दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करण्याचाही प्रस्ताव पुणे आरटीओकडून देण्यात आला होता. ‘एमएच-१२-एएए-१२३४’ अशा स्वरूपाचा क्रमांक देण्याचा विचार होता. मात्र, क्रमांकाची लांबी वाढल्यास सीसीटीव्ही तसेच स्वयंचलित नंबरप्लेट ओळख प्रणालीला (एएनपीआर) क्रमांक स्पष्टपणे टिपण्यात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही.

 

यानंतर ‘एमएच-१२-१-ए’ या पर्यायावरही विचार करण्यात आला. हा पर्याय लागू होईल, अशी शक्यता होती; मात्र त्यामध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले आहे. या अडचणी दूर करण्यासाठी वेळ लागणार असल्याने नवीन वाहनांची नोंदणी थांबू नये, यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन मालिका तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुणे आरटीओकडे जुलै २०२६ पर्यंत ४४ लाख ७१ हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झालेली आहे. पुण्यात वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने उपलब्ध नोंदणी क्रमांकांच्या मालिका वेगाने संपत आहेत. त्यामुळे ‘एमएच-६१’ ही नवीन मालिका उपलब्ध झाल्याने नवीन वाहनांच्या नोंदणीतील संभाव्य अडथळा दूर होणार आहे.

 

दरम्यान, ‘एमएच-१२-१-ए’ या पर्यायाचा प्रस्तावही पुणे आरटीओकडून मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. ही मालिका लागू करण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्यासाठीचा पर्याय खुला ठेवण्यात आला असून, पुण्यासाठी ‘एमएच-६१’ मालिका सुरू झाल्यानंतरही काही महिन्यांनी ‘एमएच-१२-१-ए’ मालिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भविष्यात हा पर्याय प्रत्यक्षात आल्यास वाहनधारकांना उपलब्ध मालिकांपैकी कोणती नोंदणी मालिका घ्यायची, याचा पर्याय निवडता येणार आहे. मात्र, तांत्रिक अडचणी कायम राहिल्यास ‘एमएच-१२-१-ए’ मालिका लागू होण्यास विलंब होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!