पलूस : पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या कामकाजात सकारात्मक बदल जाणवत असून, नागरिकांच्या तक्रारींच्या प्रमाणातही घट झाल्याचे मत संजय गांधी निराधार योजना सांगली जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव आण्णा नलवडे यांनी व्यक्त केले.
जयसिंग पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधण्याला प्राधान्य दिले आहे. तक्रारदारांचे म्हणणे समजून घेणे, किरकोळ वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर वेळीच कारवाई करणे, या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढत असल्याचे नलवडे यांनी सांगितले.
पलूस शहरासह तालुक्यातील विविध भागांत पोलीस प्रशासन अधिक सक्रिय झाले असून, अवैध धंद्यांवर कारवाई, वाहतूक शिस्त तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, अनेक तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत येण्यापूर्वीच सामोपचाराने मिटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांची कार्यपद्धती कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख असून, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे पलूस तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास निश्चितच मदत होत असल्याचे सर्जेराव आण्णा नलवडे यांनी सांगितले.
या सकारात्मक बदलामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढणे हीच प्रभावी आणि लोकाभिमुख पोलीस कार्यपद्धतीची महत्त्वाची पावती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
