सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या पुण्याच्या धावपटूचा धावताना अचानक प्रकृती बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संजय शामराव कदम असे मृत धावपटूचे नाव आहे. या घटनेमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंसह आयोजकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा शहरात रविवारी (६ सप्टेंबर) सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या १५ व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात स्पर्धेला सुरुवात झाली. विविध ठिकाणांहून आलेले धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, धावण्यादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने स्पर्धेला गालबोट लागले.

संजय कदम हे मॅरेथॉनमध्ये धावत असताना बोगदा परिसरात अचानक त्यांच्या छातीत त्रास जाणवला. काही क्षणांतच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. घटनास्थळी तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना तत्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना साताऱ्यातील प्लस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. संग्राम देशमुख, डॉ. ओंकार पाटील आणि वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान संजय कदम यांचा मृत्यू झाला.

संजय कदम हे पुण्यात वास्तव्यास होते. ते शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी यंदा विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत धावपटूला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटूंची आरोग्यविषयक माहिती आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध व्हावी यासाठी QR कोड आधारित ‘प्रोटेक्शन टॅग’ची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मॅरेथॉनसारख्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शारीरिक श्रम आणि ताण येतो. त्यामुळे अशा स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी, योग्य प्रशिक्षण आणि शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंच्या उत्साहावर या घटनेने दुःखाची छाया पसरली असून, संजय कदम यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!