स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प ( Pune MHADA) आणि पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांची अनामत रक्कम तब्बल पाच पटींनी वाढवली आहे. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही वाढ लागू करण्यात आली आहे.द
दलालांकडून मोठया संख्येने अर्ज भरले जातात?
पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक अशा मंडळाच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र त्याचवेळी अनामत रक्कम कमी असल्याने एकच व्यक्ती अनेक अर्ज भरते. त्यातही दलालांकडून मोठया संख्येने अर्ज भरले जातात. अशावेळी सोडतीत स्पर्धा वाढते आणि गरजू अर्जदार अडचणीत येतात. त्याला आळा घालण्यासाठी अनामत रक्कमेत वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. पुणे मंडळाच्या 5966 घरांच्या सोडतीतील म्हाडा गृहप्रकल्पातील 2925 घरांच्या तसेच पंतप्रधान आवास योजनेतील 396 घरांच्या अनामत रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
अशी असणार सुधारित अनामत रक्कम वाढ
अत्यल्प गटासाठी 5 हजारांवरुन थेट 25 हजार रुपये, अल्प गटातील लोकांसाठी 10 हजार रुपयांवरुन 50 हजार रुपये तर मध्यम गटातील लोकांसाठी 15 हजारांवरुन 75 हजार रुपये करण्यात आली आहे. तर उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी 20 हजार रुपयांवरुन 1 लाख रुपये करण्यात आली आहे.
