नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आता दररोज नवे गौप्यस्फोट समोर येत असून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) उघड केलेल्या धक्कादायक माहितीनंतर या घोटाळ्याची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरमधील ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पेपरफुटीसाठी वापरलेली कथित ‘हस्तलिखित ट्रिक’ आता तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मिळाल्याचा संशय बळावला आहे. २७ एप्रिल रोजी, म्हणजेच मुख्य ‘नीट’ परीक्षेच्या काही दिवस आधी, मोटेगावकर यांनी आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘मॉक टेस्ट’ आयोजित केली होती. यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल ६० पानांची हस्तलिखित पीडीएफ पाठवण्यात आली होती. या पीडीएफमधील तब्बल १३५ प्रश्न हे प्रत्यक्ष मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.
सीबीआयच्या तपासात या हस्तलिखित प्रश्नसंचाला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे. कोणत्याही डिजिटल माध्यमाचा वापर न करता, स्वतःच्या हस्ताक्षरात प्रश्न तयार करून ‘गेस पेपर’च्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पद्धतीमुळे तपास यंत्रणांनाही मोठा धक्का बसला असून, पेपरफुटीच्या रॅकेटने अत्यंत चलाखीने काम केल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, शिवराज मोटेगावकर यांचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये त्यांनी ‘नीट’ प्रश्नपत्रिकेबाबत केलेले दावे संशय अधिक गडद करणारे असल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणांनी या व्हिडिओंची दखल घेत पुढील चौकशी अधिक तीव्र केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात लातूर कनेक्शनही उघड झाले असून सीबीआयने आतापर्यंत जवळपास १० जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याचा आरोप असलेले पी. व्ही. कुलकर्णी तसेच मॉडर्न कॉलेजमधील शिक्षिका मनिषा मांढरे यांचाही समावेश आहे. या शिक्षकांकडूनच प्रश्नपत्रिका मोटेगावकरांपर्यंत पोहोचली का, याचा तपास आता सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हस्तलिखित ६० पानांच्या पुराव्याच्या आधारे सीबीआयने मोटेगावकर यांची अनेक तास कसून चौकशी केली. मात्र, या प्रश्नांच्या स्त्रोताबाबत समाधानकारक माहिती देण्यात ते अपयशी ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तांत्रिक आणि हस्तलिखित पुराव्यांच्या आधारे सीबीआयने त्यांना अटक केली.
देशभर गाजणाऱ्या या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आता आणखी कोणते मोठे चेहरे समोर येणार, या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत आणि आणखी किती जण या तपासाच्या कक्षेत येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
