कराड : तालुक्यातील सहकार आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित भेटीने तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

 

मात्र अर्ज दाखल प्रक्रियेनंतर घडलेली घटना अधिक चर्चेचा विषय बनली. डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट कऱ्हाड बाजार समिती येथे जाऊन चहापान घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही बाजार समिती ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत मानली जाते. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात असलेल्या भोसले आणि उंडाळकर गटांच्या या अप्रत्यक्ष जवळीकीकडे राजकीय निरीक्षक बारकाईने पाहत आहेत.

 

रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना सत्ताधारी गटाने राजकीय बेरजेचे प्रयत्न अधिक तीव्र केल्याचे या भेटीतून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. सध्या कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटामध्ये थेट लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेतृत्व, सहकारी संस्थांमधील प्रभाव आणि राजकीय गणितांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून उंडाळकर गटाला सोबत घेण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आजच्या भेटीनंतर त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. या भेटीदरम्यान ॲड. उंडाळकर प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी बाजार समितीचे संचालक आणि माजी सभापती विजयकुमार कदम यांनी भोसले गटाचे स्वागत केले. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक नसून त्यामागे ठोस राजकीय संदेश असल्याचे बोलले जात आहे.

 

विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर भोसले गटाची बाजार समितीतील उपस्थिती पाहायला मिळाल्याने सहकार क्षेत्रात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. आगामी काळात कृष्णा कारखाना निवडणुकीत या भेटीचा नेमका काय परिणाम होतो आणि उंडाळकर गटाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

चहापान की राजकीय संकेत?

कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत झालेल्या या चहापानाने केवळ सौजन्य भेटीपलीकडील राजकीय संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भोसले आणि उंडाळकर हे दोन प्रभावी राजकीय प्रवाह अनेक वर्षांनंतर एका चौकटीत दिसल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट आगामी सहकार राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!