जशपूर, छत्तीसगढ: ड्रीम ११, माय ११ सर्कल सारख्या फँटसी क्रिकेट ॲप्सवर टीम बनवून पैसे जिंकण्याची सध्या स्पर्धाच सुरू आहे. या ॲप्सवर ‘टीम बनवा, कोट्यवधी रुपये जिंका’ अशा जाहिराती खेळाडूंद्वारे केल्या जात असून, अनेकजण या ऑनलाइन जुगारात गुंतत आहेत. अशाच एका यशस्वी कहाणीतून छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यातील पत्थलगाव गावच्या शेतकरी पुत्राचे नशीब चमकले आहे.

 

२३ मार्च रोजी झालेल्या न्यूझीलंड वि. पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावर ड्रीम ११ वर टीम बनवून जशपूरच्या जगन्नाथ सिदार या तरुणाने १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. त्याच्या टीमला ११३८ पॉइंट्स मिळाल्याने त्याला ही मोठी रक्कम मिळाली. तथापि, हे पैसे एकदम त्याच्या खात्यात आले नाहीत. आतापर्यंत त्याने ७ लाख रुपये काढले असून, उर्वरित रक्कम हप्त्याहप्त्याने मिळत आहे.

 

गावात पेढे वाटले, घर-शेतीसाठी करणार खर्च  

जगन्नाथने हे पैसे जिंकल्यानंतर गावात पेढे वाटून आनंद साजरा केला. या रकमेचा उपयोग तो आपल्या कुटुंबाच्या भलासाठी करणार आहे. त्याने सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेतर्फे सध्या बांधकाम चालू असलेले घर मोठे आणि पक्के करणार आहे. तसेच, आजारी वडिलांच्या उपचारांसाठीही हे पैसे खर्च करणार आहे. कार किंवा सोन्याऐवजी तो शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करेल, ज्यामुळे शेतीचे काम सुलभ होईल.

 

जुगाराचा साईड इफेक्ट: गावात वाढणार जोखीम  

जगन्नाथच्या यशाने गावातील आणि आजूबाजूच्या भागातील अनेक युवक आता फँटसी लीगमध्ये पैसे लावण्यासाठी प्रेरित होत आहेत. मात्र, तज्ञांच्या मते, प्रत्येकाला जगन्नाथसारखे यश मिळणार नाही. यातून काहीजण मोठ्या आर्थिक तोट्यातही सापडू शकतात. फँटसी क्रिकेट ॲप्सवर पैसे लावणे हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण ‘व्हाईट कॉलर जुगार’ म्हणून तो सरकारी नियंत्रणाबाहेर खुलेआम चालू आहे.

 

जगन्नाथची कहाणी एका बाजूने चांगली वाटत असली तरी दुसरीकडे यामागील सामाजिक जोखीमही लक्षात घेणे आवश्यक आहे कारण एक जगन्नाथ जेव्हा घडतो तेव्हा करोडो लोकांचा आर्थिक बळी गेलेला असतो..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!