पटणा: अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तारिणी दास आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापे टाकून 11 कोटी रुपयांहून अधिक बेनामी रक्कम जप्त केली आहे. या छाप्यामध्ये इतकी मोठी रक्कम सापडली की, ती मोजण्यासाठी चार नोट मोजण्याच्या मशिना वापराव्या लागल्या आणि सतत 8 तास मोजणी चालली.
निविदा घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीची कारवाई
ही कारवाई आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्या प्रकरणाशी संबंधित असून, सरकारी निविदा मॅनेज करण्याच्या आरोपावर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीला पटण्यातील उच्चभ्रू वस्तीत बेनामी संपत्तीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बंगल्यात सापडलेल्या नोटांच्या डोंगराने पाटणा प्रशासनात हलकल्ली माजली आहे.
निवृत्तीनंतरही मिळाली होती मोठी जबाबदारी
तारिणी दास 31 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्य अभियंता पदावरून निवृत्त झाले होते, परंतु नोव्हेंबर 2024 मध्येच त्यांना पुन्हा त्याच पदावर 2 वर्षांच्या करारावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये मुख्य महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला होता. या प्रकरणात इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता असल्याने, ईडी सखोल चौकशी करत आहे.
या प्रकरणामुळे बिहार प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली आहे आणि आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.