रामबन: जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात रविवारी पहाटे अचानक झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे भीषण पूर आला. यामुळे किमान तीन व्यक्ती मृत्यू पावल्या तर अनेक घरे आणि वाहने भूस्खलनात गाडली गेली. पूर आणि भूस्खलनामुळे संपूर्ण जनजीवन बाधित झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहतूक अस्ताव्यस्त
नाशरी ते बनिहाल दरम्यानच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (NH-44) एक डझनाहून अधिक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती साचल्याने अनेक वाहने अडकली आहेत.
धरम कुंड गावात भीषण पूर
रामबनमधील धरम कुंड गावात पुराच्या पाण्यात सुमारे ४० घरे बुडाली आहेत. गावात पाणी शिरल्यामुळे लोक घाबरून उंच भागात पळून गेले. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी १०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.
वृद्ध आणि रुग्णांवर संकट
पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे स्थानिक लोकांना निर्वासित व्हावे लागले आहे. वृद्ध, बालके आणि रुग्ण यांना अन्न, औषधे आणि निवारा उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
NDRF च्या ताकदीवर बचावकार्य
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासन यांनी बचावकार्याला गती दिली आहे. तथापि, खराब हवामान आणि दुर्गम रस्ते यामुळे कामात अडथळे येत आहेत.
पर्यटकांनो सावधान!
काश्मीरमध्ये घनदाट धुके आणि चालू असलेल्या पावसामुळे दृष्यता कमी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी मदत कार्यवाही तत्परतेने सुरू केली असून, अधिक माहितीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी अपीलही केली आहे.
