नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना प्रतीक्षेत ठेवणाऱ्या नैऋत्य मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. यंदा मान्सूनच्या आगमनाला चार दिवसांचा विलंब झाला असून, नेहमीप्रमाणे १ जूनऐवजी ४ जून रोजी तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला.
हवामान विभागाने यापूर्वी मान्सून २६ मेच्या सुमारास केरळमध्ये पोहोचू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, वातावरणातील बदल आणि समुद्रावरील हवामान प्रणालींमुळे त्याच्या प्रगतीला विलंब झाला. परिणामी, पावसाळ्याच्या अधिकृत सुरुवातीलाच चार दिवसांचा उशीर नोंदवला गेला.
केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मान्सूनच्या आगमनासोबतच केरळमधील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
दक्षिण भारतात पुढील सात दिवस अतिवृष्टीची शक्यता
केरळसह तामिळनाडू, कर्नाटक आणि लगतच्या राज्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील अनेक भागांत मान्सून सक्रिय होत असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल
महाराष्ट्रातील नागरिकांसाठीही दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते ७ जूनदरम्यान मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होऊ शकते. सध्या राज्यातील अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
देशातील २४ राज्यांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा
हवामान खात्याने ओडिशा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील २४ राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. काही भागांत गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीत मान्सून कधी पोहोचणार?
उत्तर भारतातील उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २५ ते ३० जूनदरम्यान दिल्लीत दाखल होऊ शकतो. तर उत्तर प्रदेशमध्ये १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. ३० जूनपर्यंत संपूर्ण देश मान्सूनच्या प्रभावाखाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यंदाच्या हंगामात मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागल्या आहेत.
