मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असले तरी त्यांना कृषी खाते गमवावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कार्यभार काढून घेत तो आपले विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवला आहे. त्याचवेळी भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांना देण्यात आले आहे. या खांदेपालटाचा निर्णय सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कोकाटे यांना त्यांच्या कृतीबद्दल कडक शब्दांत समज देण्यात आली. अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावले की, मी आणि सुनील तटकरे यांनी वारंवार सांगूनही तुम्ही ऐकत नाही. याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचा धाक नाही. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे होते, परंतु तुमचे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे कोणतेही गैरवर्तन होणार नाही या अटीवर तुम्हाला मंत्रिपदी ठेवण्यात येत आहे. यापुढे काही चुकीचे आढळल्यास मंत्रिपद काढावे लागेल, असा इशाराही त्यांना देण्यात आला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकाटे यांची मोबाइलवर रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाली होती.
या प्रकरणामुळे विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन वादग्रस्त मंत्र्यांना बरखास्त करण्याची मागणी केली होती. कोकाटे यांच्या या कृतीमुळे अजित पवार गटावरही विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. याशिवाय, कृषीमंत्री म्हणून कोकाटे यांनी केलेली वादग्रस्त विधाने आणि त्यानंतरच्या बेताल वक्तव्यांमुळे ते सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोकाटे यांचे मंत्रिपद कायम ठेवताना खात्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खाते बदलाबाबतचे पत्र सादर केले. फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन हा बदल राज्यपालांना कळवल्याचे समजते. यानुसार, दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सुरुवातीला मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे कृषी खाते देण्याचा विचार केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही जाधव-पाटील यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यास अनुकूलता होती. मात्र, जाधव-पाटील यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली असून, सध्याचे खाते समजून घेण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगत नवीन खाते स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची सूत्रे सोपवण्यात आली.
या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना वादापासून दूर राहण्याच्या आणि जबाबदारीने वर्तन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोकाटे यांच्या प्रकरणाने महायुती सरकारमधील अंतर्गत समन्वय आणि मंत्र्यांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार कितपत सजग राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
