दिल्ली : सध्या देशातील हवाई वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्र विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पायलटचा तुटवडा, रद्द होणारी उड्डाणं, विमानतळांवरील लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा वाढता त्रास हे चित्र अनेकांनी अनुभवले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक क्षेत्रातील नोकऱ्या आणि करिअरच्या संधी अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत.
भारतामधील हवाई वाहतूक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असून हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आधार बनत आहे. सध्या या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा सुमारे 53.6 अब्ज अमेरिकी डॉलर इतका असून, 75 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर 2024 या वर्षातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 1300 हून अधिक व्यावसायिक पायलट परवाने जारी केले आहेत.
पायलट होण्यासाठी दोन मार्ग
एका नामांकित एअरलाईन्स कंपनीतील पायलटनुसार भारतात पायलट होण्यासाठी दोन प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत.
पहिला पारंपरिक मार्ग, जो अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे, आणि दुसरा म्हणजे एअरलाईन्स कंपन्यांकडून चालवले जाणारे कॅडेट पायलट प्रोग्रॅम.
पात्रता काय?
पायलट होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषयांत किमान 50 टक्के गुण असणे बंधनकारक आहे.
कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांना NIOS किंवा कोणत्याही राज्य मंडळाच्या ओपन बोर्डमार्फत भौतिकशास्त्र आणि गणित विषयांची परीक्षा देणे आवश्यक आहे.
वैद्यकीय तपासणी अनिवार्य
भारतातील विमान वाहतुकीचं नियमन DGCA करतं. पायलट प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडे आधी क्लास 2 वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. हे DGCA मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलं जातं.
त्यानंतर क्लास 1 वैद्यकीय तपासणी केली जाते, जी भारतीय हवाई दलाने मान्यता दिलेल्या डॉक्टरांकडून होते. कमर्शियल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
या तपासण्यांमध्ये डोळ्यांची तपासणी, ECG, रक्तचाचणी, तसेच नाक-कान-गळ्याच्या तपासणीचा समावेश असतो. यासाठी साधारणतः 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, रंग अंधत्व असलेल्या व्यक्तींना पायलट होण्याची परवानगी नसते.
प्रशिक्षण प्रक्रिया कशी असते?
सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना DGCAची CPL परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा वर्षातून साधारण चार वेळा घेतली जाते.
यानंतर ग्राऊंड ट्रेनिंग सुरू होतं. यात हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन, नॅव्हिगेशन, रेडिओ टेलिफोनी आणि टेक्निकल विषय शिकवले जातात. या परीक्षांमध्ये किमान 70 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
यानंतर उमेदवार DGCA मान्यताप्राप्त फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) मध्ये दाखल होतात. येथे त्यांना किमान 200 तासांचे उड्डाण प्रशिक्षण घ्यावे लागते. याशिवाय काही एअरलाईन्स कंपन्या स्वतःचे कॅडेट पायलट प्रोग्रॅमही राबवतात.
स्वप्नांना पंख देणारं करिअर
हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढती मागणी पाहता, पायलट हे करिअर आजही तरुणांसाठी आकर्षक आणि संधींनी भरलेलं मानलं जात आहे. योग्य मार्गदर्शन, पात्रता आणि प्रशिक्षणाच्या जोरावर अनेक तरुण आपलं आकाशात उड्डाण घेण्याचं स्वप्न साकार करू शकतात.
