मुंबई : देशातील बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉकरोच’शी केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या सोशल मीडिया मोहिमेच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर भारतात बंदी घालण्यात आल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. अनेकांनी दावा केला की, त्यांनी बेरोजगार तरुणांची तुलना “कॉकरोच”शी केली. या कथित वक्तव्यामुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले जात असले, तरी सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर काही तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने डिजिटल मोहीम सुरू केली. या मोहिमेचे इंस्टाग्राम आणि एक्सवर अधिकृत हँडल तयार करण्यात आले.
सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद
अत्यंत कमी कालावधीत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सोशल मीडिया अकाउंट्सना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विशेषतः इंस्टाग्रामवर या पेजने विक्रमी वेगाने फॉलोअर्स वाढवले. गुरुवारी सकाळपर्यंत या पेजवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स असल्याचा दावा करण्यात आला. तुलना करता, भाजपच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर सुमारे ८७ लाख फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोशल मीडियावर या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
‘एक्स’ अकाउंट भारतात बंद
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत एक्स अकाउंट भारतात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
या अकाउंटचे निर्माते अभिजीत दीपके यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी दावा केला की, “आधी आमचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते शक्य झाले नाही, तेव्हा थेट अकाउंट बॅन करण्यात आले.”
दीपके पुढे म्हणाले,
“आम्ही फक्त सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी करत होतो. आम्ही काहीही चुकीचे लिहिले नव्हते. तरीही आमचे खाते बंद करण्यात आले. ही कसली लोकशाही आहे?”
त्यांनी तरुणांना याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहनही केले.
इंस्टाग्राम पेज अद्याप सुरू
एक्स अकाउंटवर बंदी घालण्यात आली असली, तरी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे इंस्टाग्राम पेज अद्याप सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मोहिमेचा प्रभाव सोशल मीडियावर कायम असल्याचे मानले जात आहे.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा
या संपूर्ण प्रकरणामुळे देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया नियंत्रण आणि बेरोजगारीसारख्या गंभीर मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही जण या मोहिमेला तरुणांच्या असंतोषाचे प्रतीक मानत आहेत, तर काही जण सोशल मीडियावरील अतिरंजित प्रचार म्हणून पाहत आहेत.
दरम्यान, एक्स अकाउंटवर बंदी का घालण्यात आली, याबाबत अधिकृत स्तरावर अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
