मुंबई : बॉलिवूडचा डॅशिंग व्हिलन आणि चाहत्यांचा लाडका अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी चर्चेचं कारण त्याचा आगामी चित्रपट नसून त्याची तब्येत आहे. २०२० मध्ये स्टेज ४ फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर यशस्वी मात करून मृत्यूच्या दाढेतून परत आलेला संजू बाबा नुकताच अमेरिकेला रवाना झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर संजय दत्त स्पॉट झाला होता. त्यानंतर तो हेल्थ मॉनिटरिंग आणि नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या अमेरिकेतील लॉस एन्गेलेस येथे असून त्याच्यासोबत त्याचा जवळचा मित्र परेश घेलानीही आहे.
सध्या ६६ वर्षांचा असलेला संजय दत्त आजही तरुण कलाकारांना लाजवेल अशा उत्साहाने चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. नुकताच त्याचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट १५ मे रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो मोठ्या प्रमाणात व्यस्त होता. मात्र व्यस्त वेळापत्रक असूनही त्याने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष न करता नियमित मेडिकल चेकअपसाठी वेळ काढला आहे.
माहितीनुसार, संजय दत्त गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अमेरिकेला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. न्यू यॉर्क सिटी येथील प्रसिद्ध Memorial Sloan Kettering Cancer Center येथे त्याची नियमित तपासणी केली जाते. यावेळीही तो तिथे तपासणीसाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कॅलिफोर्नियातील काही नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांचीही तो भेट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, संजय दत्तच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रांनी चाहत्यांना धीर दिला आहे. “चिंता करण्यासारखं काहीही नाही. ही केवळ नियमित आरोग्य तपासणी आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये पसरलेली भीती काहीशी कमी झाली आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये संजय दत्तला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर झालेल्या तपासणीत त्याला स्टेज ४ फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं समोर आलं. ही बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला होता. मात्र खऱ्या आयुष्यातही फायटर असलेल्या संजू बाबाने हार न मानता उपचार, सकारात्मक विचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या काही महिन्यांत कॅन्सरवर मात केली. अखेर ऑक्टोबर २०२० मध्ये तो पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती.
आजही संजय दत्तचा तोच जिद्दी स्वभाव आणि कामाप्रती असलेलं प्रेम चाहत्यांना प्रेरणा देत आहे. त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं, तरी चाहत्यांकडून त्याच्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
