मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा आणखी एक फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा थेट परिणाम आता देशातील इंधन दरांवर दिसून येत आहे.

 

नवीन दरांनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 87 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पेट्रोलचा दर 107.87 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 94.39 रुपये प्रति लिटर झाला आहे.

 

दोन आठवड्यांत जवळपास 5 रुपयांची वाढ

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 15 मे रोजी पेट्रोल-डिझेल दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा सुमारे 90 पैशांची वाढ झाली. आता झालेल्या ताज्या दरवाढीनंतर अवघ्या दोन आठवड्यांत इंधन जवळपास 5 रुपयांनी महागले आहे. डीलर्सच्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 99.51 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 92.49 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

 

इराण युद्धाचा थेट परिणाम?

जागतिक स्तरावर इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर त्यामुळे आर्थिक दबाव वाढत असून, वाढलेल्या आयात खर्चाचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याचे मानले जात आहे. सरकार आणि तेल कंपन्यांवर वाढत्या खर्चाचा ताण निर्माण झाल्याने दरवाढीचा पर्याय स्वीकारला जात असल्याची चर्चा आहे.

 

महागाई आणखी भडकण्याची शक्यता

पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, किराणा तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दरांवर होऊ शकतो. त्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी आर्थिक ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!