पुणे: गोकुळ डेअरीने गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २ रुपये वाढवून आता ३२ रुपये केला आहे. ही दरवाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
दूध पावडर आणि लोणी यांच्या किमती वाढल्यामुळे गोकुळने हा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोठारी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गत काही महिन्यांपूर्वी गोकुळने म्हशीच्या दुधाचा दरही वाढवला होता.
मुश्रीफ यांचे आवाहन
मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या संचालकांना मुंबई आणि पुण्यात नवीन प्रकल्प सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले, “मुंबई-पुण्यात म्हशीच्या दुधाची मागणी जास्त आहे. पॅकिंग युनिटसाठी जागा अपुरी पडत असल्याने नवीन प्रकल्प उभारले पाहिजेत.”
त्यांनी शेतकऱ्यांना म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सांगितले, “२५ लाख लिटर दुधाचे लक्ष्य गाठण्यासाठी शेतकऱ्यांनी म्हशींची संख्या वाढवावी. गोकुळच्या ५ लाख सभासदांपैकी २ लाख जर प्रत्येकी एक म्हैस खरेदी करतील, तर हे लक्ष्य साध्य होईल. यासाठी बँकेतून कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.”
या कार्यक्रमात विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील, खासदार शाहू महाराज आणि आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.