मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच तब्बल ८,००० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. वाढत्या ताफ्यासह प्रवाशांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत १७,४५० चालक व सहाय्यक पदांची कंत्राटी भरती करण्यात येणार असून, यासाठी २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

रोजगाराची संधी

या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असून, त्यांना एसटी महामंडळामार्फत आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देत, होतकरू तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

३०० व्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या बससेवेला मनुष्यबळाची आवश्यकता भासत असल्याने तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने चालक व सहाय्यक नेमण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

ई-निविदा प्रक्रिया सहा विभागांत

ही भरती प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांमध्ये राबविली जाणार असून, यानंतर निवड झालेल्या मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून एसटीला आवश्यक तेवढे कर्मचारी वेळेत उपलब्ध करून दिले जातील.

प्रवाशांसाठी दिलासा

सरनाईक यांनी सांगितले की, “बसची वाढती संख्या आणि मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे राज्यातील प्रवाशांना अखंड, सुरक्षित व दर्जेदार बससेवा देणे शक्य होईल.”

ठळक मुद्दे :

  • एसटी ताफ्यात ८,००० नवीन बसगाड्या दाखल
  • १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी कंत्राटी भरती
  • २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू
  • निवड झालेल्यांना मासिक ३० हजार रुपये वेतन व प्रशिक्षण
  • प्रवाशांना अखंड, सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्याचा विश्वास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!