पुणे: भारती हॉस्पिटलने आउटलुक हेल्थ बेस्ट हॉस्पिटल रँकिंग 2025 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये 17 वा क्रमांक, पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये 15 वा क्रमांक आणि पुण्यातील सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये तिसरा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता आणि समर्पण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गेल्या 35 वर्षांपासून “प्रत्येकाची काळजी” हे ब्रीदवाक्य घेऊन भारती हॉस्पिटल आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर आहे.
भारती विद्यापीठाचे संस्थापक, स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणासोबतच आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही भरीव योगदान दिले. त्यांनी पुणे आणि सांगली येथे भारती हॉस्पिटलची स्थापना केली, जी आजही सामान्य आणि गरजू रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा प्रदान करते. त्यांचा हा वारसा डॉ. सौ. अस्मिता कदम-जगताप (कार्यकारी संचालक) आणि आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी पुढे नेला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टीच्या मार्गदर्शनामुळे भारती हॉस्पिटलने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.
1989 मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाने नाविन्य आणि रुग्णकेंद्री सेवांद्वारे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली. आज भारती हॉस्पिटल अलोपॅथी, दंतचिकित्सा, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशा विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आरोग्यसेवा प्रदान करते. याशिवाय, रुग्णालयाने आपल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी वैद्यकीय व्यावसायिकांच्या जोरावर रुग्णांना विश्वासार्ह आणि परवडणारी सेवा पुरवली आहे.
डॉ. अस्मिता कदम-जगताप आणि डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाने आरोग्यसेवेत नवीन मानके प्रस्थापित केली आहेत. रुग्णालयाची वचनबद्धता आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी यामुळे देशभरातील रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. “आरोग्यसेवा हा विशेषाधिकार नाही, तर प्रत्येकाचा हक्क आहे,” या तत्त्वावर आधारित भारती हॉस्पिटलने सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने योगदान दिले आहे.
या यशाबद्दल बोलताना, भारती हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि समुदायाचे आभार मानले. “हा पुरस्कार आमच्या कठोर परिश्रम आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोनाचा पुरावा आहे. आमच्या प्रत्येक यशात रुग्ण आणि समुदायाचा मोठा वाटा आहे,” असे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारती हॉस्पिटल भविष्यातही आरोग्यसेवा क्षेत्रात नवनवीन उपक्रम आणि उच्च दर्जाच्या सेवांद्वारे आपले योगदान देत राहील, अशी आशा आहे.