कराड : शहरात दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन कृष्णा घाटावर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शहरी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी तसेच वाहनांची वर्दळ अपेक्षित आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कराड शहर पोलिसांनी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले असून वाहन पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 

वाहतूक मार्गातील बदल

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दत्त चौक–यशवंत हायस्कूल–आझाद चौक–नेहरू चौक–चावडी चौक–बालाजी मंदिर–झेंडा चौक–कृष्णा घाट या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना प्रवेश अथवा पार्किंग करण्यास सक्त मनाई असेल.

कोल्हापूर नाक्याहून येणारी वाहने दत्त चौक–आझाद चौक–सात शहीद चौक–शुक्रवार पेठ–बालाजी मंदिर या पर्यायी मार्गे नेली जातील.

कृष्णा नाका बाजूकडून सोमवार पेठेकडे जाणारी वाहतूक कृष्णा नाका–जोतीबा मंदिर–कमानी मारुती मंदिर–सोमवार पेठ–पाण्याची टाकी–जनकल्याण बँक या मार्गे एकेरी पद्धतीने होणार आहे. कमानी मारुती मंदिराकडून कृष्णा नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल.

सोमवार पेठ, कृष्णा घाट बाजूकडून येणारी वाहतूक राजपुरोहित बेकरी–जोतीबा मंदिर–कृष्णा नाका मार्गे बाहेर काढली जाईल.

कृष्णा नाका–जोतीबा मंदिर–कमानी मारुती मंदिर–चावडी चौक–कृष्णा घाट या संपूर्ण मिरवणूक मार्गावर वाहने थांबवणे किंवा पार्किंगस मनाई आहे.

मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कर्मवीर पुतळा–पोस्ट ऑफिस–डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा–जोतीबा मंदिर हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरही वाहन प्रवेश व पार्किंग बंद असेल.

पोपटभाई पेट्रोल पंपाकडून दत्त चौकात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने भेदा चौक–विजय दिवस चौक–कृष्णा नाका मार्गे विटा बाजूकडे वळवली जातील.

विसर्जनासाठी आलेली गणेश मूर्ती वाहने मूर्ती विसर्जनानंतर नदीपात्रातील वाळवंटात तयार केलेल्या रस्त्याने स्मशानभूमी–जोतीबा मंदिर–कृष्णा नाका मार्गे बाहेर नेली जातील.

 

 

पार्किंगची विशेष व्यवस्था

गणेश विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने शहरातील ठरवलेल्या ठिकाणी पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासाठी पुढील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे :

 

1. शिवाजी उद्यान, कन्या शाळेसमोरील मोकळे मैदान.

2. श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे मैदान, दत्त चौक.

3. जनता पे अँड पार्क, यशवंत हायस्कूल मागील मैदान.

याशिवाय नागरिकांनी पर्यायी पार्किंग जागांचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

 

आपत्कालीन वाहनांसाठी मुभा

वरील मार्गांवरील वाहतूक निर्बंधांमधून रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि पोलीस दलाची वाहने यांना मात्र वगळण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या वाहनांना प्राधान्याने मार्ग दिला जाणार आहे.

 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी केलेली ही वाहतूक योजना नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी नियमांचे पालन करावे, ठरवलेल्या पार्किंग ठिकाणांचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे. “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात मिरवणूक शांततेत व सुरक्षिततेत पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!