कराड : पुणे–बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड–मलकापूर भागात बांधण्यात येत असलेला सहापदरी आणि सिंगल पिलरवर आधारलेला भव्य उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. देशातील युनिक अशा या उड्डाणपुलामुळे कराड शहरासह परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे.

 

सुमारे ३.५ किलोमीटर लांबीचा हा पूल एकूण ९२ पिलरवर उभारला गेला असून त्यावर तब्बल १,२२३ प्री-कास्ट आरसीसी सेगमेंट्स बसवण्यात आले आहेत. प्रत्येक सेगमेंटचे वजन सरासरी १२५ ते १३५ टन असून या कामासाठी धोंडेवाडीतील कास्टिंग यार्डवरून सेगमेंट आणून बसवण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काम सुरू असताना कामगारांना पगार न मिळणे, पोटठेकेदारांची मनमानी, तसेच अतिक्रमण यांसारख्या अडथळ्यांमुळे हे काम वारंवार थांबले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढून वाहनचालकांना अनेक तास महामार्गावर अडकून बसावे लागत होते आणि अपघातांचाही धोका वाढला होता.

उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झाले होते. पहिल्या टप्प्यात हॉटेल ग्रीन पार्क ते ढेबेवाडी फाटा तर दुसऱ्या टप्प्यात ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका या भागात काम पार पडले. पुलामध्ये ४० मीटरचे ७४, ३१ मीटरचे ६ आणि ३० मीटरचे ११ आरसीसी गाळे असून प्रत्येक गाळ्यात ११ ते १४ सेगमेंट बसवले गेले आहेत. सध्या कोल्हापूर बाजूचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले असून पुणे बाजूवरचे काम सुरू व्हायचे बाकी आहे.

 

अतिक्रमणामुळे सेवा रस्त्याचे व भरावाचे काम रखडलेले असले तरी प्रशासनाने त्यावर गती देण्याचे नियोजन केले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ठेकेदारांना मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून पुढील उशीर झाल्यास कारवाई होईल, असा इशाराही दिला आहे.

 

गेल्या दोन वर्षांत कामगार आणि सुरक्षारक्षकांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे आज या प्रकल्पाचे सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील कामे उरकून लवकरच हा पूल वाहतुकीस सुरू होणार आहे. त्यामुळे कराडजवळील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांचा प्रचंड त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या पुलाच्या उद्घाटनाची आतुरता आता कराडकरांसह संपूर्ण प्रवासी वर्गाला लागली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!