मुंबई : गरिबांसाठी स्वस्त दरात (₹10) जेवण उपलब्ध करून देणारी शिवभोजन थाळी योजना आर्थिक टंचाईत सापडली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत निधी वळवल्याने गेल्या सहा महिन्यांपासून 1,881 केंद्रचालकांना सरकारकडून अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी राज्यातील अनेक केंद्रे बंद पडली असून, उरलेलीही केंद्रे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

 

अनुदान थकले, केंद्रे बंद

महाविकास आघाडी सरकारने 2020 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत शहरी भागात 40 रुपये आणि ग्रामीण भागात 25 रुपये अनुदान देऊन थाळी फक्त 10 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली होती. दररोज सुमारे 1.70 लाख थाळ्या दिल्या जातात. मात्र, 2025-26 च्या अर्थसंकल्पात फक्त 70 कोटींची तरतूद झाली असून त्यातील 21 कोटी एप्रिलपूर्वी वितरित झाले; त्यानंतर एक पैसाही केंद्रचालकांना मिळालेला नाही.

राज्यभरात 200 हून अधिक केंद्रे गेल्या तीन वर्षांत बंद पडली आहेत. एका 100 थाळी केंद्रावर दरमहा 70–80 हजार खर्च येतो, तर अपेक्षित अनुदान 1.14 लाख रुपये आहे. पण हे पैसे थकले असल्याने किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, कामगारांचे मानधन देणे अशक्य झाले आहे.

 

महिला कामगारांवर परिणाम

शिवभोजन केंद्रात काम करणाऱ्या बहुतांश महिला कामगारांना दरमहा साधारण 8 हजार रुपये मिळतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा पगार रखडला असून, त्यांनी शासनाला पत्र देऊन लाडकी बहीणऐवजी शिवभोजन योजनेला निधी द्यावा अशी मागणी केली आहे.

 

योजनेचे भवितव्य धोक्यात

या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 227 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण आवश्यक निधी न मिळाल्यास हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत तरतूद झाली नाही, तर योजना पूर्णपणे बंद पडू शकते, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!