मुंबई : देशातील नैऋत्य मान्सूनचा माघारीचा प्रवास यंदा नेहमीपेक्षा पंधरा ते वीस दिवस आधी सुरू होणार असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार, १५ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून त्याची अधिकृत सुरुवात होणार आहे. साधारणपणे १७ सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात करतो, तर १५ ऑक्टोबरपर्यंत तो संपूर्ण देशातून निघून जातो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये २४ मे रोजी दाखल झाला होता, जो २००९ नंतरचा सर्वात लवकर आगमन मानला जातो. त्यानंतर २९ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण देशभर पसरला. त्यामुळे यंदा माघारही लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत मान्सूनने देशभर भरभरून पाऊस पाडला. आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा सुमारे सात टक्के जास्त आहे. वायव्य भारतात ७२०.४ मिमी पाऊस नोंदवला गेला, जो सामान्यपेक्षा तब्बल ३४ टक्के जास्त आहे. विशेषतः हिमाचल प्रदेशात या हंगामात ९६७.२ मिमी पाऊस पडला असून, पुर, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे मृतांचा आकडा ३८६ वर पोहोचला आहे. राज्यातील अनेक रस्ते व पूल वाहून गेले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात गंगेची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा २३ सेंटीमीटरने वर गेल्यामुळे जवळपास ८० गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो कुटुंबांना स्थलांतर करावे लागले असून प्रशासनाने मदत व निवारा केंद्रे उभारली आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू तसेच महाराष्ट्रात भारी ते अतिभारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे.
एकूणच, यंदाच्या मान्सून हंगामाने देशभर ओलावा निर्माण केला असला तरी पूरस्थिती, भूस्खलन, ढगफुटी आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ यामुळे मोठे नुकसानही झाले आहे. मान्सून मागे जाण्याची ही सुरुवात मागील काही वर्षांच्या तुलनेत लवकर असली, तरी अजूनही हवामानातील अस्थिरता काही काळ कायम राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
