सातारा : देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाचे जल्लोषमय वातावरण आहे. घरोघरी देवीची स्थापना करून पूजा-अर्चा सुरू आहे. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात नवरात्रोत्सवाची परंपरा वेगळ्याच पद्धतीने पाळली जाते. येथे ‘उभ्याची नवरात्र’ म्हणून ओळखली जाणारी प्रथा गेल्या साडे तीनशे वर्षांपासून सुरू असून आजही ती तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.

 

दिवसरात्र उभ्याने उपवास

या परंपरेनुसार गावातील शेकडो उपासक संपूर्ण नऊ दिवस बसत नाहीत. ते सतत उभ्यानेच राहतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. झोपेसाठी ते विशेष पाळण्याचा आधार घेतात. या पाळण्यावर छाती टेकवून आणि एक पाय वर घेऊन ते डुलकी घेतात, मात्र एक पाय जमिनीवर ठेवणे बंधनकारक असते.

 

उपवासातील कठोर शिस्त

नऊ दिवसांच्या या उपवासात तेल, मीठ व तिखटाचा संपूर्ण त्याग केला जातो. उपासक केवळ गोड पदार्थ, फळे, दूध किंवा साबुदाण्याची खीर यावर उपवास करतात. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास आरती केली जाते. पहाटे पाच वाजता उठून सर्व उपासक नैसर्गिक विधी उभ्यानेच करतात.

 

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

या परंपरेत गावातील हिंदूंसह मुस्लीम समाजातील लोकही सहभागी होतात. ‘देव जातीपातीचा नसतो’, अशी श्रद्धा ठेवून तेही नऊ दिवस हा कठोर उपवास करतात. त्यामुळे पांडे गाव धार्मिक समन्वयाचे अनोखे उदाहरण ठरते.

 

श्रद्धा आणि आस्था

गावकऱ्यांच्या मते, जितकी सेवा कठोरतेने केली जाते तितके फळ अधिक लाभते. देवीवरची ही आस्था पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक पांडे गावाला भेट देतात. भक्ती, त्याग आणि परंपरेचं अनोखं दर्शन घडवणारी ‘उभ्याची नवरात्र’ ही साताऱ्याच्या सांस्कृतिक वारशातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा ठरली आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!