मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये हे हादरे जाणवले असून सकाळी सुमारे ८.४६ वाजता हा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिंगोली शहरासह वसमत आणि कळमनुरी परिसरात अचानक जमिनीला हलकासा कंप जाणवल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर धावले. काही ठिकाणी लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उघड्या जागेत आश्रय घेतला, तर लहान मुले आणि महिलांमध्ये विशेषतः भीतीचे वातावरण दिसून आले.

 

दरम्यान, देशातील इतर भागांमध्येही अलीकडेच भूकंपाचे धक्के जाणवले होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर आणि चंदीगडसह विविध भागांमध्ये भूकंप झाला होता, ज्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे देशभरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. मराठवाड्यात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

 

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरीही प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाणे, इमारतींपासून दूर राहणे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!