अलिबाग : राज्यातील शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची घोषणा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विभागामध्ये नियमित आणि बाह्य यंत्रणेमार्फत मिळून जवळपास १२ हजार पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो युवक-युवतींना शासकीय नोकरीची संधी मिळणार असून, महिला सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, विभागातील विद्यमान पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. त्यामध्ये काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, विभागासाठी एकूण ८,६६९ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी २,८४३ पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे, लवकरच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून, तब्बल दोन दशकांनंतर होत असलेली ही भरती राज्यातील रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

दरम्यान, अंगणवाडी सेविका आणि एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणावर पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, १,१०,६६४ अंगणवाडी सेविका आणि १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २,२१,३२८ मानधनाधारित पदे निर्माण करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

तब्बल २३ वर्षांनंतर घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!