बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले होते. या साऱ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काँग्रेस पक्ष राहिला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे हे निवडणूक रिंगणात होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मुंबई ते दिल्लीपर्यंत वरिष्ठ स्तरावर चर्चा, फोनाफोनी आणि राजकीय हालचाली सुरू होत्या. अखेर या सर्व घडामोडींना पूर्णविराम देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना आकाश मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन आपला अर्ज अधिकृतपणे मागे घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार हेही उपस्थित होते. अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवार यांनी मोरे यांचे आभार मानत काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
या घडामोडींनंतर जय पवार आणि आकाश मोरे यांनी एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधला. जय पवार यांनी सांगितले की, अजित दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम केले असून, एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार चालवत होते. सध्याही महायुतीचे सरकार कार्यरत असून, सर्व पक्षातील वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. दादांना खरी श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की, निवडणुकीत इतरही काही उमेदवार रिंगणात आहेत आणि प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्याबाबत आपण कोणतीही टिप्पणी करणार नाही. तसेच आकाश मोरे आता आपल्या सोबत असून त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे सर्व पक्ष एकत्रितपणे दादांसाठी निवडणूक लढवतील, अशी भावना व्यक्त करत भविष्यात काँग्रेसच्या काही अडचणी आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा शब्दही जय पवार यांनी दिला.
दरम्यान, आकाश मोरे यांनीही आपल्या प्रतिक्रियेत महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजित पवार यांच्या नेतृत्वाला बळ मिळावे आणि भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. २०२९ पर्यंत या दृष्टीने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे काम करणार का, या प्रश्नावर त्यांनी हे विधान करत सूचक भूमिका मांडली. या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
