कराड : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने दुपारी 2.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, कराड यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन बुरूड गल्ली, चर्च रोड, राज मेडिकल, एस.टी. स्टॅण्ड, कर्मवीर पुतळा, दत्त चौक, परमार लाईट हाऊस, यशवंत हायस्कूल, गणपती मंदिर, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक, कमानी मारूती मंदिर, कन्या शाळा, ज्योतिबा मंदिर, नागोबा मंदिर या प्रमुख मार्गांवरून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त होणार आहे.
मिरवणुकीच्या अग्रभागी 2 बग्गी, 5 घोडे, 1 बॅन्जो बॅण्ड, 1 हलगी पथक, 8 बेगाळ्या आणि 3 चित्ररथांचा समावेश असणार आहे. या मिरवणुकीत सुमारे 6000 ते 7000 नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असून, कराड शहरासह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा फुले चौक, राज मेडिकल, दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, ज्योतिबा मंदिर ते नागोबा मंदिर या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.
तसेच सैदापूर कॅनॉल, विजय दिवस चौक, एस.टी. स्टॅण्ड, दत्त चौक ते कोल्हापूर नाका या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळा ते सैदापूर कॅनॉल मार्गावर मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस प्रवेश बंद राहील. पाटण तिकाटणे, शाहू चौक, दत्त चौक, आझाद चौक आणि चावडी चौक या मार्गांवरही निर्बंध लागू राहतील. तसेच सैदापूर कॅनॉल ते दत्त चौक आणि दत्त चौक ते प्रिती संगम घाट या मार्गांवर मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीस पूर्ण बंदी राहणार आहे.
या सर्व बदलांचा कालावधी 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत किंवा मिरवणूक संपेपर्यंत लागू राहणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने, शालेय बस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
नागरिकांनी वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
