संपादकीय : लग्नसंस्थेबाबत बदलत्या सामाजिक अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील वाढता तफावत सध्या प्रकर्षाने समोर येत आहे. मुली व त्यांच्या पालकांकडून मांडल्या जाणाऱ्या विशिष्ट अटी-अपेक्षांमुळे अनेक सुशिक्षित व सक्षम तरुणांचे विवाह वेळेत जुळत नसल्याचे चित्र राज्यभर दिसू लागले आहे. विशेषतः शासकीय नोकरी, शहरातील स्थायिकता, स्वतंत्र कुटुंबपद्धती आणि आर्थिक स्थैर्य या निकषांना प्राधान्य दिले जात असल्याने विवाह जुळवणी अधिकच कठीण होत आहे.

सामाजिक स्तर, शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती यापलीकडे जाऊन “परफेक्ट मॅच” शोधण्याची प्रवृत्ती वाढल्याने प्रत्यक्षात योग्य जोडीदार असूनही नातेसंबंध जुळत नाहीत. मुलगा शासकीय नोकरीत असावा, मोठ्या शहरात राहणारा असावा, किमान काही वर्षांचा शहरी अनुभव असावा, तसेच सासू-सासरे वेगळे राहणारे असावेत, अशा अपेक्षा सर्रास मांडल्या जात आहेत. या निकषांमुळे ग्रामीण भागातील किंवा शेतीशी संबंधित तरुणांना नकार मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, समाजातील लिंग गुणोत्तरातील असमतोलही या समस्येला अधिक गुंतागुंतीचा बनवत आहे. अनेक समाजांमध्ये मुलींची संख्या तुलनेने कमी असल्याने विवाहासाठी उपलब्ध पर्याय मर्यादित होत आहेत. परिणामी, उपवर मुलांचे वय वाढत असून त्यांच्या पालकांवर मानसिक व सामाजिक ताण वाढताना दिसतो.

यासंदर्भात अनेक तरुणांनी आपले अनुभव मांडले आहेत. शेखर दरेकर, व्यवसायाने प्राध्यापक, सांगतात की, “मी ३५ वर्षांचा आहे. आतापर्यंत २०-२२ मुली पाहिल्या. प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन नकार मिळतो. स्वतःचे घर, नोकरी असूनही ‘शेती नाही’ हे कारण देऊन नकार मिळणे धक्कादायक आहे.” त्याचप्रमाणे अभियंता शिवराज थळकर म्हणतात, “मी पुण्यात चांगल्या पदावर काम करतो. उच्च शिक्षण घेतले आहे. तरीही अपेक्षित मुलगी मिळत नाही. ऑनलाइन माध्यमातूनही प्रयत्न केले, पण यश आले नाही.”

कुटुंबव्यवस्थेतील बदल हेही एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिले जात असताना, आज अनेक मुलींना स्वतंत्र राहणीमान अधिक पसंत आहे. सासू-सासरे सोबत राहणे नको, दोघांनी नोकरी करून स्वतंत्र जीवन जगावे, अशा विचारसरणीला अधिक पाठबळ मिळत आहे. यामुळे पारंपरिक कुटुंबपद्धती असलेल्या मुलांना नकार मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.

विशेषतः शेती करणाऱ्या तरुणांबाबतची स्थिती अधिक गंभीर आहे. कोरोना, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विवाहाच्या बाबतीतही अडथळे येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मोठी जमीनजुमला असूनही केवळ ‘शेतकरी’ हा व्यवसाय असल्यामुळे मुलींनी नकार दिल्याचे दिसून येते. सुमारे ९० ते ९५ टक्के प्रकरणांमध्ये शेतकरी मुलांना पसंती मिळत नसल्याचे निरीक्षण आहे.

याशिवाय शिक्षणातील असमान अपेक्षाही विवाहात अडथळा ठरत आहेत. मुलगी बीई असेल, तर मुलगा एमई किंवा त्याहून अधिक शिक्षित असावा, अशी अपेक्षा ठेवली जाते. तसेच व्यसनाधीनता, दिसणे, व्यक्तिमत्त्व, शहरातील वास्तव्य यांसारखे घटकही निर्णायक ठरत आहेत. पुणे, मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या मुलांना तुलनेने अधिक पसंती मिळते.

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे विवाहसंस्थेत निर्माण झालेली असमतोल स्थिती. समाजशास्त्रज्ञांच्या मते, अपेक्षा आणि वास्तव यामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, पुढील काळात विवाहाचे वय वाढणे, एकटेपणा आणि सामाजिक ताण यांसारख्या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!