सांगली : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात लाड आणि कदम परिवाराचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. या दोन प्रतिष्ठित घराण्यांना एकत्र जोडणारा सुवर्णदुवा म्हणजे सौ. भारती महेंद्र लाड. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा, स्वभावाचा आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा उजाळा घेताना, त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव अधिक तीव्रतेने होते.

 

काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच नव्हे, तर आपल्या साधेपणा, संवेदनशीलता आणि माणुसकीने समाजाच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवतात. काँग्रेसचे दिवंगत लोकनेते डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या भगिनी आणि जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या पत्नी म्हणून ओळख असली, तरी सौ. भारतीताई लाड यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाने एक स्वतंत्र आणि प्रेरणादायी स्थान निर्माण केले.

 

भारतीताईंचा जन्म हा जणू डॉ. पतंगराव कदम यांच्या आयुष्यातील एका शुभपर्वाची सुरुवात ठरला. त्यांच्या जन्मानंतरच पतंगरावजींच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला एक नवी दिशा मिळाली. वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्पष्ट दिसून येत होता. माहेरचा वारसा त्यांनी सासरीही तितक्याच समर्थपणे जपला.

 

महेंद्र लाड यांच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचालीमागे भारतीताईंचे भक्कम आणि निःस्वार्थ पाठबळ होते. संघर्षाचे क्षण असोत किंवा यशाचे टप्पे, त्या सावलीसारख्या त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या. त्यांच्या या निःशब्द साथीतूनच महेंद्र लाड यांच्या कार्याला अधिक स्थैर्य आणि बळ मिळाले.

 

धार्मिक वृत्ती, करुणा आणि गरजवंतांप्रती असलेली ओढ हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या दारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी आदर, सन्मान आणि मायेचा स्पर्श दिला. त्यांच्या या उदार आणि संवेदनशील वृत्तीमुळे शेकडो कुटुंबांना आधार मिळाला.

 

त्यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांवर ऋषिकेश आणि रोहन अत्यंत मोलाचे संस्कार केले. आज त्यांच्या कार्यातून हे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. ऋषिकेश लाड ‘भारती शुगर’च्या माध्यमातून विविध साखर कारखान्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘भारती शुगर’ हे नाव देणे ही त्यांच्या कृतज्ञतेची आणि आदराची जिवंत अभिव्यक्ती आहे. तसेच सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी बाब आहे. रोहन लाड यांनीही बांधकाम क्षेत्रात अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, लाड परिवारातील प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक मंगल प्रसंगात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. मात्र त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी उभारलेली मूल्यव्यवस्था हीच त्यांची खरी ओळख आहे.

 

सौ. भारतीताई लाड या केवळ एका कुटुंबापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या एका संस्कारक्षम, माणुसकी जपणाऱ्या आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!