कुंडल: प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल येथील सन १९९९-२००० सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा म्हणजेच ‘गेट टुगेदर’ रविवार दि.१४ मे २०२३ रोजी थाटात पार पडला. तीन महिन्यांपासून सुरु असलेले नियोजन ते आनंदाश्रूनी परतणारे बालपणीचे मित्रमैत्रिणी इथे पर्यंतचा प्रवास सर्वांनी कायमस्वरूपी मनात साठवून ठेवला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सी. एल. रोकडे, सौ. टी. एच. चिटणीस, सौ. एस. एस. कवठेकर, एम. एल. पुजारी होते तर अध्यक्ष्यस्थानी मुख्याध्यापक सी. व्हाय. जाधव होते. निलम लाड व राखी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास वागावकर यांनी प्रास्ताविक केले. अमित पाटील व प्रवीण विभूते यांनी कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना केल्या.
एकमेकांचे बदलेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २३ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल मधील १९९९ ते २००० या कालावधीत दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. २०२२ च्या दिवाळीतच या कार्यक्रमाची खरी मुहूर्तमेढ झाली होती. काहीही करून मे महिन्यात हा कार्यक्रम करायचाच असा निर्धार काही मित्रांनी मिळून केला व मार्च २०२३ मध्ये खूप विचार करून १४ मे हि तारीख सर्वात आधी निश्चित केली. त्यानंतर अमित पाटील, प्रवीण विभूते, वैभव हेंद्रे, कैलास वागावकर, मनोज पाटील, अनिता आवटे, रंजना खारगे, यांनी मिळून एक नियोजन कमेटी बनवली व त्यामध्ये यांच्या सहित सचिन कदम, संदीप पवार, राहुल सावत, संदीप माळी, रसिका खारगे, निलम लाड, शुभांगी विभूते, प्रिया दिवटे, धनश्री लाड या सर्वांचा मिळून एक ‘टास्क फोर्स’ बनला. त्यानंतर शाळेतून सर्व माजी विद्यार्थांची लिस्ट काढून प्रत्येकाला वैयक्तिक संपर्क करून जवळपास २०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले व हे सर्व करण्यसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी गेला. सर्व मुलामुलींचे संपर्क करून मुलांचा वेगळा व मुलींचा वेगळे असे दोन Whatsapp ग्रुप बनविण्यात आले व त्यावरती रोज टास्क फोर्स कडून कार्यक्रमाच्या सूचना देण्यात येत होत्या.
मुलांचे संपर्क करण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या पण त्यापेक्षा जास्त चालेंजींग काम मुलींना एकत्र करणे हे होते पण अनिता आवटे, रंजना खारगे, रसिका खारगे यांनी अत्यंत प्रभावीपणे व पूर्णपणे वेळ देऊन सर्व मुलींना एकत्र केले. या कार्यक्रमासाठी जी तयारी केली होती ती सर्वत्र चर्चेचा विषय बनत गेली. कार्यक्रमासाठी १७० विद्यार्थी जमले होते हे खूप विशेष होते. टास्क फोर्सने कार्यक्रम कसा असेल याच्याबद्दल गुप्तता पाळली होती कारण त्यांना एक गोड सरप्राईज सर्व मित्रमैत्रीणीना द्यायचे होते त्यामुळे सर्वांनाच खूप उत्सुकता लागली होती कि कार्यक्रमा कसा असेल?
शेवटी टास्क फोर्सच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला, कार्यक्रमाच्या दिवसाची सुरवात हि ‘२०२३ ला, पुन्हा एकदा दहावीला’ या स्लोगनच्या अनावरणाने झाली व प्रत्येकाच्या खिशाला लावण्यासाठी एक स्पेशल बॅच बनविला होता. त्यानंतर कार्यक्रमाची सुरवातच कुंडलच्या बोर्डिंग पासून ते शाळेपर्यंत हालगी, तुतारीच्या तालावर व फटाक्यांच्या जल्लोषात शाळेत एकत्र चालत जाण्याचा अनुभवाने झाली. संपूर्ण कार्यक्रमात स्पेशल चहा, नाष्टा, व्हेज-नॉन व्हेज जेवण, आईस्क्रिम, चॉकलेट्स सहित सेल्फी पॉईंटचे हटके सरप्राईज मिळाले. मुलींनी इनडोअर गेम्स, उखाणे घेत एन्जॉय केलाच शिवाय एकसे एक रील्स बनवून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला तर मुलांनी मैदानावरती चौकार, षटकार खेचत क्रिकेटचा आनंद बालपणीच्या सवंगड्याबरोबर लुटला. कार्यक्रमाची आठवण म्हणून सर्वाना एक मोठा फोटो व अत्यंत देखणे स्मरणचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थांनी वर्गणी काढली त्याचे संपूर्ण नियोजन मनोज पाटील यांनी पहिले.
कार्यक्रमात सर्वांची ओळख स्टेजवरती येऊन प्रत्येकाने केली तर काहींनी मनोगत व्यक्त करत शाळेतील गमतीशीर किस्से सांगितले. मुलींचा उत्साह अतिशय जबरदस्त होताच पण तितक्याच त्या भावनिक सुद्धा झाल्या व एक वेळ अशी आली कि त्यांना त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली. एकूणच मैत्रीचा हा उत्सव अत्यंत अविस्मरणीय झाला.
आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी मानत कार्यक्रमाची गोड आठवणींनी सांगता केली.

