मुंबई : लाखो खातेदार असलेल्या न्यू इंडिया बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात महिनाभरापासून फरार असलेला आरोपी उल्हनाथन अरुणाचलम हा अखेर रविवारी पोलिसांना शरण आला. त्याच्यावर घोटाळ्याच्या रकमेतील सुमारे ३० कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे. उल्हनाथनला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. उल्हनाथनच्या अटकेने या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.

न्यू इंडिया बँकेच्या महाव्यवस्थापक आणि अकाऊंट्स विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या हितेश मेहताने पदाचा गैरवापर करत अन्य साथीदारांच्या मदतीने बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार केला. बँकेतील या आर्थिक अनियमिततेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्शी घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात मेहतासह धर्मेश पौन, माजी सीईओ अभिमन्यू भोवन, मनोहर अरुणाचलम आणि शनिवारी कपिल देढिया याला गुजरात येथून अटक केली. मात्र मेहताच्या चौकशीत नाव आलेला व सुमारे ३० कोटी रुपयांचा लाभार्थी असलेला उल्हनाथन फरार होता. पोलिसांची अनेक पथके त्याच्या मागावर होती. मात्र तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते.

पोलिसांकडून शोध सुरू असतानाच उल्हनाथन रविवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याची १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सौरऊर्जा यंत्रणा पुरवण्याचा व्यवसाय असलेल्या उल्हनाथनला मेहताने ३० कोटींपेक्षा अधिक रक्कम दिल्याचे समजते. त्याच्या चौकशीतून याबाबत अधिक खुलासा होईल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Source: Maharshtra Times

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!