मुंबई: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून पक्षात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी पक्षातील दोन वरिष्ठ महिला नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद उघडकीला आले असून, त्यामुळे पक्षांतर्गत शिस्त आणि नीतीमूल्यांवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे कौतुक करून त्यांना ‘शाब्बास!’ अशी शाबासकी दिली. वाघ यांच्या या प्रतिक्रियेमुळे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

तर दुसरीकडे, पक्षाच्या माजी खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून, “कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे,” असे टिप्पणी केली.

 

कुलकर्णी यांनी आंदोलनाचे सभ्य मार्ग असावेत, तसेच प्रसिद्धीच्या हव्यासामुळे पक्षाच्या नीतीमूल्यांची पायमल्ली होत असल्याचेही स्पष्ट केले. त्यांनी या संदर्भात पक्ष संघटनेने योग्य समज देण्याची जबाबदारी शहराध्यक्षांवर टाकली आहे.

 

या प्रकरणामुळे भाजपमध्ये दोन वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे दर्शन घडत आहे. एकीकडे आक्रमक आंदोलनाला पाठिंबा देणारे नेतृत्व, तर दुसरीकडे शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक कृतीचा आग्रह धरणाऱ्या नेत्यांचा गट उभा आहे. यामुळे ‘भाजपमध्ये नेमके काय चालले आहे?’ असा प्रश्न राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

 

पक्षाच्या अंतर्गत या मतभेदांवर उच्चस्तरीय नेतृत्व कसा प्रतिक्रिया देते, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!