सांगली: पारंपरिक शेतीला मागे टाकून आधुनिक पद्धतीने शेती करून अनेक शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. अशाच प्रेरणादायी कथेमध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाच्या १७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने डाळिंब लागवडीतून कोट्यवधी रुपये कमवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. योग्य नियोजन आणि कष्टाच्या जोरावर केलेल्या या शेतीमुळे त्याला वार्षिक १ कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
दुष्काळी भागातील ‘लाल सोने’
सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळग्रस्त भाग असून, येथे पाण्याची कमतरता असतानाही शुभम मरगळे या तरुणाने डाळिंबाची शेती करून यश मिळवले आहे. डाळिंब हे कमी पाणी आणि जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. शुभमने १५ एकर जमिनीवर ४००० डाळिंबाची झाडे लावून यंदा ७० टन उत्पादन घेतले. प्रतिकिलो २२५ रुपये भाव असल्याने त्याला साधारण १ कोटी ५७ लाख रुपये महसूल मिळाला, तर निव्वळ नफा सुमारे ७ लाख रुपयांचा झाला.
कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि कष्टाचे फळ
शुभमच्या या यशामागे त्याच्या वडिलांचे आणि काकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळेच मोठ्या प्रमाणावर डाळिंब पिकविणे शक्य झाले. शुभम म्हणतो, “योग्य पद्धतीने शेती केल्यास दुष्काळग्रस्त भागातही चांगले उत्पन्न मिळू शकते. डाळिंब शेतीला कमी पाणी लागते, पण योग्य ज्ञान आणि व्यवस्थापन आवश्यक आहे.”
डाळिंब शेतीची आव्हाने आणि शक्यता
अलीकडे डाळिंब शेतीला रोग, कीटक आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तरीही, शुभमसारख्या तरुण शेतकऱ्यांनी हे पीक यशस्वीरित्या पिकवून नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्याच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही डाळिंब शेतीकडे वळण्यास प्रेरणा मिळाली आहे.
“जमीन आणि ज्ञान योग्य पद्धतीने वापरल्यास शेती हीच खरी गोल्डमाइन आहे!”