मलकापूर: इनर व्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइजने आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण केले असून, यावर्षीच्या अध्यक्षपदी सौ. छाया शेवाळे आणि सेक्रेटरीपदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड झाली आहे. कोरोना काळासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत चार्टर प्रेसिडेंट छाया शेवाळे यांनी काही मैत्रिणींच्या सहकार्याने या क्लबची स्थापना केली. अवघ्या चार वर्षांत क्लबने सामाजिक कार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी वैशाली अशोक पाटील, खजिनदारपदी वैशाली लक्ष्मण पाटील, आयएसओ सीमा पाटील, संपादक रेखा राजगडकर, सीपीसी वैदही कुलकर्णी यांची निवड झाली आहे. तसेच, कार्यकारिणी समितीमध्ये साक्षी पाटील, आशा माने, वैशाली गुरुप्रसाद पाटील, विजया फडतरे, तर विकास अधिकारी म्हणून पल्लवी पाटील, सुनिता चव्हाण, सुनीता पाटील आणि स्वप्नाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
क्लबच्या वतीने यावर्षी निसर्ग संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक जनजागृती, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे. अध्यक्ष छाया शेवाळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी यापुढेही सामाजिक कार्याची ही वाटचाल अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. क्लबच्या कार्याला समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.