वाघेरी (कराड): भारताच्या इतिहासात सामाजिक सलोख्याला व एकतेला नेहमी सर्वोच्च स्थान मिळाले आहे. इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले, पण समाजातील प्रत्येक घटकाने एकतेच्या बळावर त्यांना हद्दपार केले. आजच्या काळातही आपल्याला हाच धडा लक्षात ठेवून समाजातील सलोखा व ऐक्य जपले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पद्मजा लाड यांनी केले. त्यांच्या हस्ते मक्तब आईशा (रजी.) लिल बनात-वाघेरी (कराड) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण करण्यात आले तसेच मदरसा अरबीया इनअमुल उलुम, वाघेरी-कराड येथे सामाजिक कार्यकर्ते ॲड. मिलिंद लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमास मदरशाचे अध्यक्ष हाजी साजिद भाई पटेल, मदरसा मुख्याध्यापक मौलाना अशपाक, वाघेरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच इमरान पटेल, सेवानिवृत्त शिक्षक एम. डी. मास्तर, कराड व परिसरातील नामांकित आयडल क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष पटेल सर, वाघेरीचे युवा नेते अझर पटेल, वाघेरीच्या तलाठी मॅडम तसेच शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी वाघेरी ग्रामपंचायती तर्फे लाड कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
मरहूम हाजी सुलतान पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेला अनाथ व गरीब मुलांसाठीचा हा आधाररुपी वटवृक्ष पाहून लाड कुटुंबीयांना खूप आनंद झाला. यावेळी वृक्षारोपणाचाही उपक्रम लाड कुटुंबीयांनी राबविला. या ठिकाणी शिकणारे सर्व विद्यार्थी हे अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना मार्गदर्शन करताना ॲड. पद्मजा लाड व ॲड. मिलिंद लाड हे भावुक झाले.
ॲड. पद्मजा लाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “देशाची खरी ताकद ही आपल्या समाजातील ऐक्यात आहे. आपण हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी अशा विविध घटकांचे आहोत, पण राष्ट्राची ओळख ही एक आहे आणि ती म्हणजे आपण भारतीय आहोत. त्यामुळे भेदभाव न करता सामाजिक सलोखा व बंधुभाव टिकवणे हेच प्रत्येक भारतीयाचे कार्य आहे.”

शिक्षण आणि युवकशक्तीवर भर
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, शिक्षण हेच राष्ट्रनिर्मितीचे मूळ साधन आहे. केवळ रोजगार मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय नसून, समाजासाठी जबाबदार नागरिक घडवणे हाच त्यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करून स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाचा आदर्श घ्यावा.
युवकांना उद्देशून त्या म्हणाल्या, “देशाची खरी संपत्ती म्हणजे युवा वर्ग आहे. युवकांनी केवळ मोबाईल, सोशल मीडिया किंवा फॅशनपुरते मर्यादित न राहता विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण व समाजकारण या क्षेत्रांतही योगदान दिले पाहिजे. बेरोजगारीचे संकट हे एकतेच्या बळावर व कौशल्य विकासाच्या माध्यमातूनच दूर होऊ शकते.”
स्त्रीशक्तीचा सन्मान
ॲड. पद्मजा लाड यांनी स्त्रियांच्या योगदानावर विशेष भर दिला. स्वातंत्र्यसंग्रामातील मुस्लिम महिलांच्या सहभागाचे महत्व व त्याबद्दलची माहिती दिली. “भारत माता म्हणजेच आपली जननी आहे. आई, बहीण, मुलगी यांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महिलांना शिक्षण, रोजगार व समाजातील सर्व क्षेत्रांत समान संधी मिळाल्यास देश अधिक वेगाने प्रगत होईल. स्त्रियांच्या सहभागाशिवाय खरी लोकशाही अपूर्ण आहे,” असे त्या म्हणाल्या.
पर्यावरण आणि स्वच्छतेची हाक
स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली, पण विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पाणी बचत, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त मोहिम व स्वच्छतेकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. “आज आपण जर पर्यावरण न जपले, तर उद्या पुढील पिढ्यांना स्वच्छ हवा व पाणी मिळणे कठीण होईल,” अशी जाणीव त्यांनी करून दिली.
ॲड. मिलिंद लाड म्हणाले..

तंत्रज्ञान आणि नवा भारत
डिजिटल युगात आपण मागे राहता कामा नये, असे सांगून ते म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्रामीण भागातही प्रगती साधता येईल. शेतकऱ्यांनी ड्रोन, आधुनिक साधने वापरावीत, विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, संगणकशास्त्र यांचा अभ्यास करून नवे भारत घडवावा.
समाजातील जबाबदारीची जाणीव
भाषणाच्या शेवटी ॲड. मिलिंद लाड यांनी आपल्या धर्माबरोबरच इतरांच्याही धर्माचा आदर करणे हे समजावून सांगून विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “फक्त हक्क मागणे पुरेसे नाही, तर कर्तव्य पार पाडणेही महत्त्वाचे आहे. देशाने आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे; आता आपली जबाबदारी आहे की आपण समाजातील दुर्बल घटकांना मदत करावी, गरीब व वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे.”
लाड कुटुंबीय नेहमी सामाजिक कार्यात सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिले आहे. औंध संस्थानचे मंत्री स्व. बाबुराव गोविंद लाड यांचे पणतू व ज्येष्ठ समाजसेवक स्व. जयसिंगराव बाबुराव लाड यांचे नातू हे ॲड. मिलिंद लाड आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणे हे त्यांच्या रक्तातच असल्याने स्वतःला झोकून देऊन समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणे काम करणे ही त्यांच्याबरोबरच संपूर्ण लाड कुटुंबीयांची ओळख सर्वपरिचित आहे.
स्वातंत्र्य दिनादिवशी झालेल्या ध्वजारोहण समारंभात यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व कराड तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
