मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद होत आहे. रस्ते, गटारे, रेल्वे स्थानके पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र कारणीभूत आहे. त्याचबरोबर ईस्ट-वेस्ट शेअर झोन सक्रिय झाला असून, यासोबतच सायक्लोनिक सर्क्युलेशन विकसित झाले आहे. या संयुक्त परिणामामुळे राज्यात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, “राज्यातील विविध भागांमध्ये पुढील ४८ तासांपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळासह पाऊस सुरू राहू शकतो.”
दरम्यान, बचाव पथके, एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज आहेत. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र
ईस्ट-वेस्ट शेअर झोन व सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय
मुंबई, कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस
वाहतूक व्यवस्था विस्कळीत, प्रशासन सतर्क
