लेह : लेह-लडाखमध्ये तरुणाईच्या आंदोलनाने सोमवारी उग्र वळण घेतले. लडाखला राज्याचा दर्जा देऊन संविधानिक अधिकार बहाल करावेत, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या तसेच भाजपच्या स्थानिक कार्यालयालाही आग लावण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लेह-लडाख बंदची घोषणा करण्यात आली होती.

 

प्रशासनाने सुरुवातीला आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती बेकाबू होत गेल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला. तरीदेखील आंदोलक आक्रमक राहिले, त्यामुळे अखेर अतिरिक्त पोलिस दलाची मदत घेण्यात आली. या कारवाईनंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.

 

गेल्या पंधरा दिवसांपासून लेह-लडाखमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यापासून हे आंदोलन वेगाने पसरले असून, तरुण, महिला आणि विविध सामाजिक संघटनाही त्यात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, उपोषणकर्त्यांपैकी काहींची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिला आंदोलक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आंदोलकांमध्ये अधिकच रोष उसळला आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले.

 

या घडामोडींमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. कारण, ६ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून लडाखमधील प्रतिनिधींशी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, त्याआधीच प्रदेशात आंदोलन चिघळल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

सध्या पोलीस व प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात घेतली असली तरी लडाखमध्ये असंतोषाचे वातावरण कायम आहे. आंदोलनाचा व्याप वाढत असल्यामुळे पुढील काही दिवस प्रदेशातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!